सिंधुदुर्गात 'ड्रग्स फ्री' मोहीम राबवा

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच वेधलं लक्ष
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 21, 2023 13:03 PM
views 69  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयात "ड्रग्स फ्री" मोहिम राबविणेबाबत अंमली पदार्थ विरोधी व जनजागृती पदार्थ जिल्हा समन्वयक  ऍड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचं लक्ष वेधलं. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण ८ तालुके असून जिल्हयाच्या सीमा रेषेजवळ कर्नाटक व गोवा राज्य आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ड्रग्स, चरस, गांजा, कोकेन व इतर तत्सम अंमली पदार्थांची जिल्हयात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री, वाहतुक व विशेषतः जंगल भागामध्ये लागवड होत असून सुमारे ५० हजार पेक्षा जास्त युवावर्ग या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. या घातक व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून अनेक सुशिक्षित बेरोजगार वाम मार्गाला वळल्याचे निदर्शनास येत आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या शासकीय समितीने अधिक जोमाने व डोळयात तेल घालून या गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील काही सामाजिक संस्था व निवडक, जबावदार सामाजिक कार्यकर्ते लागेल ती मदत व सहकार्य करायला तयार आहेत. तरी जिल्हा प्रशासनामार्फत जबाबदार सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरीक याची एकत्रित संयुक्त बैठक आयोजित करून अंमली पदार्थाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स फ्री करण्यासाठी विशेष कृती आराखडा तात्काळ तयार करून त्याची अंमलबजावणी प्राधान्य क्रमानं होणे आवश्यक आहे. यासाठी NCB विभाग, गोवा यांचे सहकार्य मिळण्यासाठी सक्त सूचना देण्यात याव्यात. या विनंती अर्जाचा गांभिर्याने विचार करून व तातडीने दखल घेवून राज्य व जिल्हा प्रशासनाला तातडीने योग्य ते आदेश निर्गमित करावे अशी मागणी अंमली पदार्थ विरोधी व जनजागृती पदार्थ जिल्हा समन्वयक  ऍड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केलीय.