
सावंतवाडी : शिकारीला गेलेला असताना अचानक बंदुकीचा बार उडाल्याने गोळी लागून वेर्लेतील सचिन सुभाष मर्गज (वय २८ ) या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबतची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सिप्रीयन ॲन्थॉनी डान्टस ( वय ३५, रा. कोलगाव ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत युवकाचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सचिन मर्गज व सिप्रीयन डान्टस हे शुक्रवारी सकाळी ओवळीये येथे शिकारीला गेले होते. याच दरम्यान सिप्रीयन याच्या हातातील काडतूसच्या बंदूकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे त्याच्या सोबत असलेल्या सचिन मर्गज याच्या शरीरात बंदुकीतील शेरे घुसले. या घटनेमुळे गंभीर जखमी झाल्याने तो खाली कोसळला. सकाळी ९.३० ते १०.३० च्या दरम्याने ही घटना घडली. त्याचे वडील सुभाष मर्गज यांना कळल्यानंतर त्यांनी त्याबाबतची फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृत सचिनचे शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. सचिन मर्गज हा इलेक्ट्रिशियन होता. लहान मोठी काम तो करायचा. कामानिमित्त सांगेली येथे मावशीकडे राहायचा. त्याच अनुषंगाने त्याची सिप्रीयनशी ओळख झाली होती. त्याच्या पश्चात आई, वडिल व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे वेर्ले तसेच सांगेली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











