
दोडामार्ग : पाण्यात बुडून एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९:५५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुधा नारायण रेडकर रा. मणेरी, नुतनवाडी असे मृत महिलेचे नाव असून सासोली हेदुस ते बडगेवाडी जाणाऱ्या बंधाऱ्याजवळ ही घटना घडली.
मणेरी येथील श्री सातेरी देवीचा २३ नोव्हेंबर रोजी जत्रौत्सव होता. या जत्रोत्सवास जाऊन येते असे सांगून सुधा रेडकर या घरातून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडल्या. मात्र त्या घरी परत आल्या नाहीत. यावेळी त्यांचा शोधही घेण्यात आला. सासोली हेदुस ते बडगेवाडी जाणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्याच्या खाली डाव्या बाजूस एका लाकडाला त्यांचा मृतदेह अडकल्याचे मंगळवारी सकाळी ९:५५ वाजण्याच्या सुमारास दिसून आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. विठ्ठल नारायण रेडकर (६४, रा. मणेरी, नूतनवाडी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.













