जमीन वादातून महिलेची महिलेलाच मारहाण

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 23, 2025 18:51 PM
views 21  views

कणकवली : जमिनीतील वादाच्या कारणातून हळवल‌ - मळेवाडी येथील मयुरी मयूर डावल (३०) यांना मारहाण केल्याप्रकरणी हळवल - ब्राह्मणवाडी येथील दीपिका दिलीप पंडित (५४) हिच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सकाळी ९.३० वा. सुमारास ब्राह्मणवाडी येथे घडल्याचे मयुरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

फिर्यादीनुसार मयुरी व दीपिका या दोन कुटुंबांमध्ये जमिनीवरून वर्षभरापासून वाद आहे. मयुरी यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधायचे आहे. त्यासाठी त्या सदर जमिनीत साफसफाई करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी दीपिका हीने 'तू येथे काम करायचे नाही' असे म्हणत शिवगाळ करून मयुरी यांच्या पोटावर काठीने मारहाण केली. यावेळी मयुरी यांच्या हातातील कोयता खाली पडला. हाच कोयता मयुरी उचलत असताना दीपिका यांनी कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोयता मयुरी यांच्या उजव्या हाताच्या एका बोटाला लागून दुखापत झाली. तर या वेळच्या झटपटीत मयुरी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.