
सावंतवाडी : माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात देवगडाच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने ( वय ४८) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्याला सावंतवाडी पोलिसांनी देवगड येथून ताब्यात घेतले. मात्र, त्याची प्रकृती अस्थिर असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला उपचाराकरता दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचारानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने शुक्रवारी राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याआधी देवगडच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका प्रणाली माने व मुलगा आर्य माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यावर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन केलेल्या तपासात प्रिया चव्हाण याच्या आत्महत्येला प्रणाली माने यांचा नवरा मिलिंद माने कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मिलिंद माने यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात संशयित सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तात्काळ सावंतवाडी पोलिसांनी देवगड येथे जाऊन मिलिंद माने याला ताब्यात घेत सावंतवाडीत आणले. मात्र, मिलिंद माने याची प्रकृती अस्थिर असल्याने त्याला उपचाराकरता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, मिलिंद माने यांचा आत्महत्या प्रकरणांमध्ये केलेल्या चौकशीत सहभाग दिसून आला असून त्याला आम्ही या प्रकरणात सह आरोपी केले आहे. त्याच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटक करण्यात आलेली नाही. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे.