
सावंतवाडी : कणकवलीत २० दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी धाड टाकत ट्रेलर दाखवला होता. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ३० किलोचा गांजा जिल्ह्यात आणणाऱ्याला पकडा, तुम्हाला माहितीय तो कोण आहे. तुमच्या चेकपोस्टवरून तो जिल्ह्यात येतोच कसा ? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला होता. मात्र, दोन आठवड्यानंतरही जिल्ह्यात गांजा सप्लाय करणाऱ्या त्या माफियावर कारवाई झाल्याचे दिसत नाहीय. त्यामुळे या गांजा माफियांना नेमकं अभय देतय कोण ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेकडून अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून अवैध धंद्यांचा बिमोड केला जातोय. दररोज जिल्ह्यात होणाऱ्या कारवाईंची संख्याही मोठी आहे. मात्र, अनेकांचा संसार, युवकांची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गांजावर होणाऱ्या कारवाईची आकडेवारी ही किरकोळ आहे. दरम्यान, पानटपरीवरील तंबाखूजन्य पदार्थांवर होणारी चिरीमीरी कारवाई जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गांजा अन् गांजा माफियांवर होणाऱ्या कारवाया किरकोळ स्वरूपात होत असल्याचे दिसतय. त्यात दस्तुरखुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनीच भर पत्रकार परिषदेत ३० किलोचा गांजा जिल्ह्यात आणणाऱ्याला पकडा, तुम्हाला माहिती आहे तो कोण ! असे विधान करत आव्हान दिलेले असताना अद्याप त्या गांजा माफियावर पोलिसांकडून कारवाई झाल्याचे दिसत नाहीय.
एकुणच, जिल्ह्यातील तरूणांच आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, पिढी बरबाद, महिलांच कुंकू पुसणाऱ्या या गांजावर जिल्ह्यातील होणारी कारवाई संशय निर्माण करणारी आहे. एकीकडे पालकमंत्री श्री. राणे म्हणत आहेत की पोलिसांनी गांजा माफिया माहीत आहे. मग, नेमकं घोड अडतय कुठे ? हा सवाल आहे. यातूनच गांजा माफियांना अभय देतय कोण ? याबाबत जिल्ह्यात उलट सुलट चर्चांना उधाण आलय. तर येणाऱ्या काळात जिल्ह्यात पोलिस खात्याकडून 'गांजाची मूळ' मूळापासून उपटून टाकली जावीत, अशी अपेक्षाही सर्वसामान्यांतून व्यक्त होतेय.