
कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथील सचिन आनंद पवार (४१) यांच्यावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बांधकरवाडी-श्रीरामनगर येथे घडली. याप्रकरणी सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ जणांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबाच्या व्हॉटस्अॅप गु्रपवर अघोरीकृत्याबाबत मेसेज टाकल्याच्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.
मालवण तालुक्यातील शिरवंडे येथे ग्रामसेवक असलेले सचिन पवार हे कणकवलीत बांधकरवाडी येथे राहतात. त्यांनी कुटुंबाच्या व्हॉटस्अॅप अघोरीकृत्याबाबत मेसेज टाकला होता. त्यावरून त्या ग्रुपमधील लोकांचे सचिन यांच्याशी वाद निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास सचिन पवार यांना याबाबत जाब विचारण्यासाठी दिलीप नामदेव पवार, मल्हार दिलीप पवार, चेतन दिलीप पवार, जयश्री दिलीप पवार, काजल मल्हार पवार हे पाच जण सचिन यांच्या घरी आले होते. ग्रुपवर टाकलेल्या मेसेजवरून सचिन व त्यांच्यात वाद झाला. यावादातून पाच जणांनी सचिन व त्यांच्या पत्नी माधुरी पवार यांना लाथाबुक्कांनी मारहाण केली. चेतन याने बेल्डने सचिन यांच्या शरीरावर वार केल्याने ते जखमी झाले. त्यानंतर ही मंडळी त्याठिकाणाहून निघून गेली. जखमी सचिन यांना पत्नी माधुरी यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते. याप्रकरणी सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिलीप नामदेव पवार, मल्हार दिलीप पवार, चेतन दिलीप पवार, जयश्री दिलीप पवार, काजल मल्हार पवार यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे करीत आहेत.