
दोडामार्ग : झरेबांबर येथील दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दोन्ही दुकानातील मिळून सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
झरेबांबर येथील संदीप घाडी यांचे चिकन विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात आले असता त्यांना दरवाज्याचे कडी तोडल्याचे दिसून आले. त्यामुळे आत जाऊन पाहिले असता सुमारे पाचशे रुपये चोरीस गेल्याचे त्यांना समजले. याव्यतिरिक्त चाळेश्वर मंदिरा कडील एक गॅरेजचे कुलूप चोरट्यांनी फोडल्याचे मालकास शुक्रवारी सकाळच्या सुमारास दिसून आले. गॅरेज मधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे, मशिनरी असे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. सलून व्यवसायिकाच्या दुकानाची कडी देखील चोरट्यांनी तोडली. मात्र आतील सामान सुखरूप होते. तसेच सासोली मध्ये 4 दुकाने फोडून चोरट्यानी रोख रक्कम लंपास केली. तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ होत असून पोलिसांनी चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी केली जात आहे.














