
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी तुळस येथील सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून रिक्षा कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.
या कारवाईत संतोष मेघश्याम नाईक (वय ५६, रा. तुळस, ता. वेंगुर्ला) आणि मेलविन फर्नांडिस (रा. पेडणे, गोवा) या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची रिक्षा कार आणि ६३ हजार ३६० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू असा एकूण २ लाख १३ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या दारू आणि वाहनासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ), (इ), ८१, आणि ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड आणि पोलीस अंमलदार अमर कांडर यांचा समावेश होता. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस अधिक तपास करीत आहेत.













