स्थानिकाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी

दाम्पत्यावर गुन्हा दाखल
Edited by: लवू परब
Published on: June 17, 2025 21:52 PM
views 535  views

दोडामार्ग :  कोणतेही कारण नसताना स्थानिक रहिवाशाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोडामार्ग बाजारपेठेतील एका परप्रांतीय न्हाव्यासहित त्याच्या पत्नीवर दोडामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

 याबाबत  सविस्तर माहिती अशी की शहरातील जुने पोलीस दुरक्षेत्र जवळ (गोवा रोडवर ) अशोक नारायण शिरोडकर ( रा. दोडामार्ग बाजारपेठ ) यांचे घर असून त्यांच्या घरात न्यू लुक्स मेन्स हे हेअर कटिंग सलून चे महेश सदृल्ला याचे दुकान आहे. श्री. शिरोडकर यांच्या घरालगत आनंद निळकंठ कामत  राहतात.

 सदर सलून मध्ये ये - जा करणाऱ्यांना  महेश सदृला हा त्यांच्या गाड्या श्री.कामत यांच्या  घरासमोर लावण्यास सांगतो. तसेच महेश ने आपल्या दुकानातील कापलेल्या केसांची व्यवस्था ही कामत यांच्या घरा लगतच केली आहे. आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे श्री. कामत यांनी घरासमोर लावलेल्या गाड्या काढण्यास महेश ला सांगताच तो व काही मिनिटांनी दाखल झाली त्याची पत्नी यांनी श्री. कामत यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी दिली. महेशच्या पत्नीने तर थेट कामत यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकाराची आनंद कामत यांनी अशोक शिरोडकर यांना तातडीने कल्पना देऊन पोलिसात धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली असता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(2),3(5) अन्वये ह्या परप्रांतीय न्हावी पती-पत्नीवर गुन्हे दाखल केले आहेत.