८२ किलो गोमांस बाळगल्याप्रकरणी दिलासा नाहीच

जिल्हा न्यायालयाने तो आदेशच केला रद्द
Edited by: विनायक गांवस
Published on: October 31, 2025 20:12 PM
views 266  views

सावंतवाडी : ८२ किलो गोमांस आणि संबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी सर्फराज भाऊद्दिन ख्वाजा याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी सावंतवाडी न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी नाकारून त्याला तातडीने जामिनावर मुक्त केले होते. सावंतवाडी पोलिसांच्या रिव्हिजन अर्जावर सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने हा आदेश रद्द केला.

सावंतवाडी पोलिसांनी बाहेरचावाडा, सावंतवाडी येथील रहिवासी सर्फराज भाऊद्दिन ख्वाजा याला ८२ किलो गोमांस व इतर साहित्य बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी आरोपीला सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले आणि तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मागितली. न्यायालयाने पोलिसांची मागणी नाकारून आरोपीस न्यायालयीन कोठडी दिली आणि त्वरित जामिनावर त्याची मुक्तता केली.

सावंतवाडी न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध सावंतवाडी पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांच्या वतीने दाखल करण्यात आला होता.

या रिव्हिजन अर्जावर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीअंती, श्रीमती देशमुख यांनी सावंतवाडी न्यायालयाचा पूर्वीचा आदेश रद्द केला. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सर्फराज भाऊद्दिन ख्वाजा याला पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ८२ किलो गोमांस बाळगल्याप्रकरणी पोलिसांना आता पुढील तपास करणे शक्य होणार आहे.