
कणकवली : जानवली येथील रिगल कॉलेजचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आता प्रवेश करीत कपाट फोडून ५ लाख ४ हजार ६०१ रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार रविवारी १९ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी वृषाली रुपेश परब (३६, रा. फोंडाघाट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरीप्रकरणी एका संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंद असलेले रिगल कॉलेज पाहून चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी कॉलेजचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. यानंतर कॉलेजमधील कपाटाचा दरवाजा चोरट्यांनी फोडून ५००, २००, १००, २०,१० रुपयांचा नोट व २०, १०, ५, २, १ रुपयांचे कॉईन असा ५ लाख ४ हजार ६०१ रुपये व बँकांची पासबुके लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे करीत आहेत.