चोरीचे सत्र थांबेना, कुडाळ मध्ये पुन्हा चोरी

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 22, 2025 21:24 PM
views 41  views

कुडाळ : घरातली माणसे झोपलेली असताना सुद्धा चोरटयांनी लक्ष्मी पूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले  सुमारे ७ तोळ्याचे दागिने  चोरून नेले. कुडाळ-श्रीरामवाडी येथील मुंबई गोवा महामार्ग नजीक राहणाऱ्या पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरी पहाटे साडेतीन ते  ४ वाजण्याच्या सुमाराला हि धाडसी चोरी झाली.  सुमारे १ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पुरुषोत्तम तांडेल यांच्या पत्नी सौ. स्मिता पुरूषोत्तम तांडेल यांनी कुडाळ पोलिसात  दिली आहे. 

याबाबत घटनास्थळी उपलब्ध झालेल्या आणि कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे त्यामुळे साहजिकीच  तांडेल कुटुंबीयांनी घरातील काही दागिने देवघरात पूजेला ठेवले होते. त्या दागिन्यांमध्ये सौ. स्मिता यांच्या ४५ ग्रॅम वजनाच्या २२ हजार ५०० रुप्याच्या दोन पाटल्या आणि १० ग्राम वजनाचे रु. ४०००/- किमतीचे चांदीचे नाणे पूजेला ठेवले होते. सौ. स्मिता यांनी तक्रारीत म्हटल्या प्रमाणे त्यांचे मंगळसुत्र पुजेच्या वेळी त्यांच्या गळ्यात होते. पुजा करुन झाल्यावर रात्री झोपण्यापुर्वी म्हणजे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या  सुमारास त्या पाटल्या व चांदीचे नाणे डबी मध्ये भरुन देव्हाऱ्याच्या  वर ठेवले. झोपताना  गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे आणि १ लाख ६२ हजार रूपये किमतीचे  मंगळसुत्र टोचत असल्याने ते काढुन उशी जवळच्या  पिशवीत ठेवलेले होते. 

     पहाटे ३.३०  च्या मानाने घरात कोणीतरी फिरत असल्याचा भास सौ. स्मिता यांना भास झाला. त्यांचे पती सकाळी लवकर उठुन नारळ खरेदी करीता मारुती मंदीर येथे जातात. त्यामुळे त्यांना वाटले की त्यांचे पती उठुन नारळ खरेदी करीता जात आहेत. तरी त्यांनी  उठुन पडदा बाजुला करुन बाहेर गाडी आहे का पाहिले तर बाहेर गाडी होती. त्यामुळे त्या  परत मी झोपल्या. पहाटे ४  वाजताच्या मानाने त्यांचे पती उठले असता त्यांना मागचा दरवाजा उघडा दिसला.  त्यामुळे त्यांनी सौ. स्मिता याना उठवले.  त्यांनी दोघांनी जावुन पाहिले असता घराचा पुढील दरवाजा व मागिल दरवाजा उघडे होते. त्यावेळी त्या दोघांनी जावुन कपाट पाहिले असता ते उघडे होते.  कपाटात असलेली चांदीची वाटी, दोन चांदिची निरंजने व सोन्याचे दागिने असलेली पिशवी सुरक्षित असल्याचे दिसुन आले. पण देव्हाऱ्यावर ठेवलेल्या  सोन्याच्या  पाटल्या व चांदीचे नाणे असलेली डबी दिसुन आली नाही. मग स्मिता यांनी झोपताना उशाजवळ ठेवलेले मंगळसुत्र शोधले तर ते सुद्धा ठेवलेल्या जागी नव्हते. 

      सौ. स्मिता यांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली. घटनास्थळी पहिले असता घराचा दरवाजा खिडकीतून घाट  उघडता येतो. त्यामुळे चोरट्याने त्या प्रकारे दरवाजा उघडला. घरात चार माणसे राहतात. पुरुषोत्तम आणि सौ. स्मिता तसेच त्यांचा मुलगा राजेश आणि त्याची पत्नी. राजेश आणि त्याची पत्नी दुर्गा हे वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत तर पुरुषोत्तम आणि त्यांची पत्नी स्मिता तळमजल्यावर झोपले होते. साधारण साडेतीन चार वाजण्याच्या सुमाराला चोरट्याने घराची कडी बाहेरून हात घालून उघडून घरात प्रवेश केला असावा. तळमजल्यावरच उजव्या बाजूला देवघर आहे. त्या ठिकाणी ठेवलेल्या पाटल्या आणि चांदीचे नाणे उचलून त्यांने मोर्चा सौ. स्मिता झोपलेल्या खोलीच्या दिशेने वळवला. तिथे पिशवीत ठेवलेले त्यांचे मंगळसूत्र त्याने उचलले. बाजूच्याच खोलीत असलेले दुसरे कपाट उघडण्याचा देखील त्याने प्रयत्न केला असावा. नंतर चोरटा वरच्या मजल्यावर जात असताना नेमक्या त्याच वेळी सौ. दुर्गा याना कसला तरी आवाज झाला. पण असेल कसला तरी आवाज म्हणून त्यांनी दुर्लक्ष केला. पण त्याच वेळी धोका वाटल्याने चोरट्याने मागचा दरवाजा उघडून पलायन केले. 

     चोरीची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर श्वान पथक देखील मागवण्यात आले. श्वान मागच्या दरवाजाने  गेला. तिथून उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला जाऊन घुटमळला. फॉरेन्सिक पथक सुद्धा घटना स्थळी दाखल  झाले होते. त्यांनी ठसे वगैरे घेतले. आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे काम देखील सुरु होते. 


     या प्रकरणी सौ. स्मिता पुरुषोत्तम तांडेल (वय ७०, रा. श्रीरामवाडी, कुडाळ) यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. धडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.