आत्महत्या प्रकरणातील 'तो' मोबाईल सापडला

हरवला नव्हे, युवकानेच विकला होता मोबाईल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 12, 2025 15:57 PM
views 1524  views

कणकवली : मोबाईल हरवल्याचे कारण सांगून थेट आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या सोहम चिंदरकर (२२, कलमठ - कुंभारवाडी) व ईश्वरी राणे (१८, कणकवली - बांधकरवाडी) यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. सोहम याचा मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे सोहमचा मोबाईल हरवला नव्हता तर त्यानेच कणकवलीतील एका विक्रेत्याला विकला होता, अशी बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी आज शुक्रवारी हा मोबाईल ताब्यात घेतला. 

'माझा मोबाईल हरवला असून त्यामध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत. मोबाईल कुणाला सापडला तर माझी बदनामी होईल.', असे मेसेज सोहम याने आपल्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरी हिला केले होते. ईश्वरी हिने समजावूनही सोहम ऐकत नसल्याने अखेरीस दोघांनी एकत्रितरित्या तरंदळे धरण गाठून थेट पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती. 

सोहमच्या मोबाईलमध्ये नेमके आक्षेपार्ह काय आहे? असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. मोबाईल बंद असल्यामुळे 'लोकेशन'ही सापडत नव्हते. अखेर पोलिसांनी विविध मार्गांनी तपास करत कणकवली शहरातीलच एका विक्रेत्याकडून हा मोबाईल ताब्यात घेतला. हा मोबाईल सोहम याने आपल्याला विकला होता, अशी माहिती त्या विक्रेत्याने कणकवली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे मोबाईल 'फॉरमॅट' मारलेल्या स्थितीत असल्याने त्यातील आक्षेपार्ह बाबी समजू शकलेल्या नाहीत. हा मोबाईल सोहम याने स्वतःच फॉरमॅट केला होता का, असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

दरम्यान सोहम याच्याविषयी वेगवेगळ्या बाबी पोलीस तपासात पुढे येत आहे. अगदी ग्रामस्थांमध्येही 'व्यसन - जुगार' आधी मुद्द्यांविषयी चर्चा सुरू आहेत. सोहम याच्यामुळे ऐन बारावीत शिकणाऱ्या ईश्वरी हिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त होत आहे.