कळसुली घरफोडीतील चोरट्याकडून जिल्ह्यातील 17 चोऱ्यांची कबुली

सांगवेसह कणकवलीतील तीन घरफोड्यांमध्ये सहभाग : 53 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 13, 2025 20:12 PM
views 29  views

कणकवली : कळसुली - गडगेवाडी येथील विनायक दळवी यांचे बंद घर दिवसाढवळ्या फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मिळून सुमारे 13 लाख 92 हजाराचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कसुन तपास करत सीसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी संतोष रामाप्पा नंजन्नावार (रा.शिरोळ,कोल्हापूर, मुळ.हुक्केरी, बेळगाव) याला शिताफीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याने कळसुलीसह जिल्ह्यातील 17 घरफोड्यांची कबुली दिली असून यामध्ये कणकवली तालुक्यातील सांगवेसह तीन चोऱ्यांचा समावेश आहे. या चोरट्याकडून 17 घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण 53 लाख 51 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती एलसीबीचे पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे यांनी दिली. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1.15 वा.च्या सुमारास कळसुली गडगेवाडी येथील विनायक दळवी हे कुटुबियांसह घरासमोरील शेतात भात कापणीसाठी गेले असताना संशयित संतोष रामाप्पा नंजन्नावार याने त्यांचे घर बंद असल्याची टेहळणी करुन त्यांच्या घरात चोरी केली होती. 

याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.मोहन दहिकर व अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांनी या घरफोडीचा समांतर तपास करण्याबाबत एलसीबीला आदेश दिले होते. त्याप्रमाणे एलसीबीने तपास पथके तयार केली होती. पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करुन तात्काळ रवाना केली होती. एलसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सखोल तपास करुन सीसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडी करणारा वरील आरोपी 8 नोव्हेंबर रोजी निष्पन्न केला होता. त्याला सापळा रचुन शिताफीने शिवनक, शिरोळ-कोल्हापूर येथून अटक करण्यात आली होती. त्याने कळसुलीसह कणकवली तालुक्यातील सांगवे, कणकवली शिवाजीनगर सह 17 घरफोड्यांची कबुली दिली आहे. 

आरोपी संतोष याला गुरुवार पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्याला गुरुवारी पुन्हा कणकवली न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 

दरची कामगिरी पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली  एलसीबीचे पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे, उपनिरिक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत, अनिल हाडळ, पोलिस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, सुरेश राठोड, डॉम्निक डिसोजा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, बस्त्याव डिसोजा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालविस, महेश्वर समजिस्कर, अमर कांडर यांनी तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या अंमलदार धनश्री परब, युवराज भंडारी यांनी केली. त्याचे पोलिस अधिक्षकांनी अभिनंदन केले आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक हनुमंत भोसले करत आहेत.

गेल्या सहा-सात महिन्यापासून आरोपी होता जिल्ह्यात- संतोष नंजन्नावार हा आरोपी कोल्हापूरचा असून त्याचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. बंद घरांची टेहळणी करुन घरफोडी करणे हि त्याची मोडस आहे. गेल्या जून महिन्यापासून तो तळेरे येथे रुम घेवून राहत होता. त्याच्याकडे दुचाकी आणि कार देखील आहे. जिल्ह्यातील 17 घरफोड्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. या 17 पैकी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न, तीन ठिकाणी रोकड चोरी आणि उर्वरित 13 ठिकाणी सोन्या-चांदीचे दागिने चोरी त्याने केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 47 लाखांचे दागिने, 1 लाखाची रोकड आणि त्याच्याकडील दुचाकी आणि कार असा मिळून 53 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे तपासी अधिकारी एलसीबीचे हनुमंत भोसले यांनी सांगितले. आरोपी संतोष याच्यावर अल्पवयीन असताना काही गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले.