
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर कणकवली पोलिसांचाही आता कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी यापूर्वीच १२ आरोपींवर गुन्हा दाखल आहे. मात्र या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे. आणखी 30 ते 40 आरोपी वाढतील असे कणकवली पोलिसांनी सांगितले.
अद्याप या कारवाईप्रकरणी 12 आरोपी वगळता अन्य कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र बारा आरोपींचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले असून त्यांचा सीडीआर अहवाल आजच प्राप्त झाला आहे. त्यातून मिळत असलेल्या माहितीच्या अनुषंगाने अनेक आरोपींवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती कणकवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी दिली.