
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज, ३१ जुलै २०२५ रोजी, तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नदीकिनाऱ्यावरील सहा अनधिकृत वाळू उपशाचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, तलाठी श्रीमती मयेकर, पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी सहभागी होते. शासनाने वाळू उपशाला बंदी घातलेली असतानाही, गेल्या काही दिवसांपासून कर्ली नदीमध्ये बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू काढली जात होती. याच बेकायदेशीर कामासाठी हे सहा अनधिकृत रॅम्प तयार करण्यात आले होते, जे आज प्रशासनाने पूर्णपणे नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसला आहे.