
सावंतवाडी : आफताब कमरुद्दीन शेख याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांदा शहरातील पाचही संशयितांवर गुन्हा दाखल करून, तात्काळ अटक करावी अशी मागणी मयताचा भाऊ अब्दुल रझाक शेख यांनी केली. मात्र, बांदा पोलिसात आज दिवसभरात संशयितांवर गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी आजही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तपास सुरु असून दोन दिवसात जाबजबाब नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेक्षण व न्यायवैद्यक तपासणी टीमने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मयताने गळफास घेतलेल्या खोलीतील काही सामान तपासासाठी ताब्यात घेतले. त्याने काल पहाटे गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली होती. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा येथे उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. मयताच्या नातेवाईकांना त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्या करण्यापूर्वीचा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सापडला. यामध्ये त्याने बांदा येथील ५ तरुणांची नावे घेत व्यवसायाला विरोध करत असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मृताचे नातेवाईक आक्रमक होत जोपर्यंत संबंधित ५ संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, बांदा पोलीस ठाण्यात काल आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रात्री उशिरा बांदा पोलीस ठाण्यात जात नातेवाईकांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बांदा पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आदी उपस्थित होते. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत तात्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते.
एसपी डॉ. दहिकर यांनी यावेळी सांगितले की, बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करून त्यातून जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले. यावेळी त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे आवाहन नातेवाईकांना केले. मात्र, नातेवाईकांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत, मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कायम ठेवला. रात्री उशिरा मयताचा भाऊ अब्दुल याने गुन्हा दाखल करण्यासाठी रीतसर अर्ज बांदा पोलिसात दिला. आज दिवसभरात गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाने नातेवाईकांना केली.














