कुडाळ : कुडाळ परिसरात फ्लॅटच्या भाड्याच्या वादातून तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची थरारक फिर्याद काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांच्या काटेकोर तपासानंतर या प्रकरणामागील सत्य बाहेर आले असून, हा संपूर्ण प्रकार फिर्यादी सिद्धेश गावडे याने स्वतःच बनवला असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी आता आता फिर्यादी सिद्धेश गावडेवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती निवती पोलीस स्थानकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.
खोटा प्रकार रचून पोलिसांत फिर्याद! : फिर्यादी सिद्धेश प्रमोद गावडे (वय २२, रा. माड्याचीवाडी, मधलीवाडी, ता. कुडाळ) यांनी पोलिसांत तक्रार केली होती की, किशोर सिधू वरक (वय ४०, रा. खानोली, ता. वेंगुर्ले) याच्याशी झालेल्या भाड्याच्या वादातून त्याचे अपहरण करण्यात आले. वरक व त्याचे दोन साथीदार ‘झोरे’ व ‘गवस’ यांनी पांढऱ्या एर्टिगा कारमधून गावडेला जबरदस्तीने गाडीत बसवून गोवेरीमार्गे खानोलीकडे नेले. त्यानंतर जंगलात लाथाबुक्क्यांनी आणि दांड्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधले, तोंडात फडका कोंबला आणि याचा आवाज कायमचा बंद करूया असे म्हणत जीवघेणा हल्ला केला, असा दावा सिध्देश गावडे याने केला होता.
पोलिसांनी 100 सीसीटीव्ही व 100 वाहनांची तपासणी केली : सिद्धेश गावडेच्या तक्रारीनुसार निवती पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासासाठी करमळगाळू ते गोवा या मार्गावरील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज व १०० एर्टिगा वाहनांची तपासणी करण्यात आली. परंतु घटनास्थळ, वेळ, व आरोपींबाबत काहीच पुरावे मिळाले नाहीत.तसेच, सिद्धेश गावडेच्या जबाबात वारंवार विसंगती दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी उलट तपास सुरू केला. मेडिकल रिपोर्टमध्ये मारहाणीची कोणतीही जखम आढळून आली नाही.
सीसीटीव्ही फुटेजने उघड केले सत्य : टेक्निकल पुरावे तपासताना पोलिसांच्या हातात महत्वाचा धागा लागला. सिद्धेश गावडे १५ ऑक्टोबर रोजी पणजी येथे आपल्या कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. त्याच दिवशी तो बांदा बसस्टॉपजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही आढळला.या दोन्ही पुराव्यांवरून पोलिसांना खात्री पटली की सिद्धेश गावडे याचे अपहरण झालेच नव्हते. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता सिद्धेश गावडे याने अखेर कबुली दिली की, किशोर वरक यांनी आपल्या विरोधात दाखल केलेल्या चोरीच्या अर्जाची कारवाई टाळण्यासाठीच हा सर्व बनाव रचला होता असे सिद्धेश गावडे याने सांगितल्याची माहिती श्री. गायकवाड यांनी दिली.
पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक! : या प्रकरणातील फिर्यादी आणि विरोधक या दोघांकडून पोलिसांवर अविश्वास दाखविला जात होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले, तरीसुद्धा पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास काम केले.पोलिसांची व्यावसायिक तपास पद्धत आणि तपशीलवार पुरावा संकलन याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या तपासात निवती पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक झंजूर्णे (बांदा), सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर, फौजदार शामराव कांबळे, आशिष किनळेकर, नितीन शेडगे, सुबोध मळगावकर, आणि सचिन कुंभार यांचा मोलाचा सहभाग होता.












