ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणुक ; 97 लाख करून घेतले ट्रान्सफर

9 लाख होल्ड करण्यात यश
Edited by: विनायक गांवस
Published on: November 27, 2025 19:07 PM
views 326  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात सायबर गुन्हेगाराने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून स्वतःला 'मुंबई क्राईम ब्रँच 'चे अधिकारी असल्याचे भासवले आणि त्यांचे तब्बल ९७ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ज्येष्ठ नागरिकाला १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. आरोपीने त्यांना सांगितले की, आपल्या बँक खात्यातून २५ लाख रुपयांचा व्यवहार झाला असून, आपण मनी लॉन्ड्रींग प्रकरणात संशयित आहात. यासंबंधी चौकशीसाठी आपणास तत्काळ मुंबई क्राईम ब्रँच येथे हजर राहावे लागेल.

ज्येष्ठ नागरिक मुंबईला प्रत्यक्ष येण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यावर, आरोपीने त्यांना 'ऑनलाइन चौकशीला सामोरे जा' असे सांगून पूर्णपणे जाळ्यात ओढले. यानंतर, विविध क्लृप्त्या वापरून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातील मुदत ठेव (Fixed Deposits), म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवलेली संपूर्ण रक्कम  ९७ लाख रुपये आरटीजीएस (RTGS) द्वारे आपल्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि उशिरा रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

9 लाख होल्ड करण्यात यश

सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे सायबर पोलिसांच्या मदतीने करत आहेत. या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात तत्काळ हालचाली करत सायबर पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग यांच्या पथकाला अवघ्या ३ ते ४ तासांत सुमारे ९ लाख रुपये होल्ड (फ्रीज) करण्यात यश आले आहे. सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग या प्रकरणाचा पुढील समांतर तपास करत आहे.

पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, महत्त्वाचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचे कोणतेही कॉल किंवा मेसेज (उदा. बँक, पोलीस, तपास यंत्रणा किंवा सरकारी कार्यालयातून) आल्यास घाबरून जाऊन कोणताही प्रतिसाद देऊ नका. तत्काळ आपल्या जवळच्या व्यक्तीला याबद्दल माहिती द्या.

सायबर फसवणुकीच्या कोणत्याही प्रयत्नाची माहिती तात्काळ १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर रजिस्टर करावी आणि नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.