
सावंतवाडी : अवैध मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या सुमारे २६ हजार रुपये किमतीच्या एकूण ३० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजगाव गरड नाका येथे करण्यात आली.
तौसीफ ताजुद्दीन सौदागर (वय ३८, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) हा व्यक्ती अवैध दारू घेऊन प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गरड नाका परिसरात सापळा रचण्यात आला. आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास, संशयित तौसीफ सौदागर हा व्यक्ती एका ट्रॅव्हल बॅगेतून दारूच्या बाटल्यांची वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्या बॅगेत गोवा बनावटीच्या दारूच्या ३० बाटल्या आढळल्या, ज्यांची अंदाजित किंमत सुमारे २६ हजार रुपये आहे. पोलिसांनी संशयित आरोपी तौसीफ सौदागर याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रविण वालावलकर, महेश जाधव, अनिल धुरी आणि संजय कोरगावकर यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वी केली.













