
सावंतवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज सकाळी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीची अवैध दारू आणि आलिशान एक्सयुव्ही कार जप्त केली. एकूण ११ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंबोली ते सावंतवाडी रोडवर सापळा रचला. यावेळी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने लगेच कारवाई करत मोहळ येथील अजित सुखदेव जगताप आणि पंढरपूर येथील पुंडलिक नामदेव बाबर या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीची एक एक्स यू व्ही कार आणि १ लाख ६७ हजार ४०० रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त केली. जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ११ लाख ६७ हजार ४०० रुपये इतकी आहे.
दरम्यान, अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (इ), ८१ आणि ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.