
सावंतवाडी : सावंतवाडीतील दुचाकी चोरी आणि गोवा येथील टॅक्सी चालकावरील हल्ला प्रकरणात अटक केलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गोव्यातील मालपे येथे टॅक्सीच्या चालकावर जीवघेणा हल्ला करून सावंतवाडी शहरात येत येथील दोन दुचाकी तसेच मोबाईल चोरी करून, एका बंद घरात घरफोडीचा प्रयत्न केला होता.
यातील अजय सुनील भोसले (वय २७, रा. तुळजापूर), शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या (वय अंदाजे २५, रा. मोहोळ, सोलापूर), आणि राजू मधुकर पवार ऊर्फ गुड्या (वय अंदाजे २४, रा. मोहोळ, सोलापूर) यांना जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले होते. त्यानंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सोमवारी, त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. ९ जुलै रोजी रात्री १० ते १० जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा, श्रमविहार कॉलनी आणि लक्ष्मीनगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न झाला होता. याच दरम्यान एका दुचाकीसह दोन मोबाईल चोरी झाल्याची घटनाही घडली. घटनास्थळी दोन पाळ कोयते आढळल्याने, यामागे मोठ्या गुन्हेगारी टोळीचा हात असल्याचा संशय बळावला होता. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची यशस्वी कारवाई
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास करत, सुरुवातीला कर्नाटक राज्यातील बंगळूरु येथून शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या आणि राजू मधुकर पवार ऊर्फ गुड्या या दोन सराईत आरोपींना मोठ्या कौशल्याने अटक केली. याच गुन्ह्याशी संबंधित तिसरा संशयित आरोपी अजय सुनील भोसले याला तुळजापूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.