आरोंद्यातून रशियनला अटक

Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2025 20:03 PM
views 244  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा-रेडकरवाडी येथे व्हिसा नसतानाही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका रशियन नागरिकाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव युरी व्लादिमिरोविच बोझ्को (वय ४४) आहे. त्याच्यावर विदेशी नागरिक अधिनियम, १९४६ च्या कलम १४ (अ), ७ आणि १४ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 आरोपी युरी बोझ्को हा २२ मे २०२४ पासून आरोस-रेडकरवाडी येथील बळवंत शांताराम केरकर यांच्या घरात राहत होता. त्याचा व्हिसा केव्हाच संपला होता. तरीही तो अवैधरित्या भारतात राहत असल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश प्रभाकर अरवारी यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, केरकर यांनी या रशियन नागरिकाला आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली होती, परंतु याबाबत त्यांनी प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे केरकर यांच्यावरही कारवाई होऊ शकते.

१९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता सावंतवाडी पोलिसांनी युरी बोझ्कोला अटक केली. त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी (मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड) सुनावली. त्यानंतर आरोपीला कारागृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.