
मालवण : शहरातील वायरी गर्देरोड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मटका जुगारावर धाड टाकत चौघांवर कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य असा एकूण १७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील वायरी गर्देरोड येथे मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकत दिनार रमेश मिठबावकर (वय- ५०, रा. वायरी गर्देरोड), सुधीर आडीवरेकर (रा. सावंतवाडी), नजीर मेमन (रा. सावंतवाडी), वैभव वाडकर (रा. कांबळेवीर, ता. कुडाळ) या चौघांवर कारवाई केली.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार यांनी ही कारवाई केली. काल सायंकाळी ही कारवाई झाली असून मालवण पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.