
सावंतवाडी : तालुक्यातील विविध भागात घरफोड्या करून उच्छाद मांडणाऱ्या एका आंतरराज्य सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संतोष रामाप्पा नंजनवार (वय ३४, रा. नेरली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे या आरोपीचे नाव असून, त्याने सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील तीन मोठ्या चोऱ्यांची कबुली दिली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये नेमळे येथील मोहनदास खराडे यांच्या घरातून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच, कणकवली पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या एका चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) संतोष नंजनवार याला ताब्यात घेतले होते.
कणकवली पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने सावंतवाडी तालुक्यातील तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर काल, ३० डिसेंबर रोजी सावंतवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीने कबुली दिलेल्या गुन्ह्यांचा तपशील आणि जप्त केलेले सोने खालीलप्रमाणे असून यात मोहनदास खराडे नेमळे ६० ग्रॅम, रंजना वणेकर ओटवणे २० ग्रॅम,रविंद्र पाटील आंबोली - ४ ग्रॅम असे सावंतवाडी पोलिसांनी आरोपीकडून एकूण ८४ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.
हा तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, उपनिरीक्षक प्रमोद पाटील आणि पोलीस हवालदार श्री.गलोले करत आहेत.














