
२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी मटका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीचा परिणाम संबंध जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांमध्ये दिसून येत आहे. गणेशोत्सव सुरू असतानाही जिल्हाभर अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कणकवली पोलिसांनी कणकवली शहरात गोवा दारूची अनधिकृत विक्री सुरू असलेल्या दोन ठिकाणी छापा टाकलला. दोन्ही ठिकाणी मिळवून १ लाख ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तृप्ती तुळशीदास हुन्नरे (रा. कणकवली - शिवाजीनगर) ही राहत्या घराच्या पडवीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सकाळी ११ वा. सुमारास करण्यात आली. वैशाली शशिकांत बोर्डवेकर (५८, रा. कणकवली - कांबळी गल्ली) ही कांबळीगल्ली येथीलच एका पडवीत, अडगळीच्या ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुपारी १२.२५ वा. सुमारास करण्यात आली.
दोन्ही ठिकाणच्या कारवायांमध्ये पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, हवालदार पांडुरंग पांढरे, विनोद सुपल, कॉन्स्टेबल उज्ज्वला मांजरेकर आदी सहभागी झाले होते.