
कुडाळ: जिल्ह्यात अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीची दारू आणि दोन कारसह एकूण १० लाख ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता झाराप येथील झिरो पॉईंटवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी नासीर इक्बाल राजगुरु, अनंत अरुण मेस्त्री, शांताराम विष्णू कावले (सर्व रा. सावंतवाडी) आणि ओमकार सावंत (रा. ओरस) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गोवा बनावटीची दारू आणि दोन गाड्या जप्त करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार प्रकाश कदम, विल्सन डिसोझा, आशिष जामदार आणि पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांचा समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे दारू विक्रेते, जुगार अड्डे आणि अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या काळातही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.