
कणकवली : घर बांधण्यासाठी जमिन देत नसल्याच्या रागातून मुलाने आईला शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन डोक्यावर दगड फेकून मारला. यात आई संगीता सुरेश तायशेटे (रा. हरकुळ बु. कावलेवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हरकुळ बु. कावलेवाडी येथेच घडला. विशेष म्हणजे मुलगा मंगेश सुरेश तायशेटे (मूळ रा. हळकुळ बु. सध्या रा. फोंडाघाट) याने चक्क पोलिसांच्या उपस्थितीतच ही मारहाण केली. याप्रकरणी संगीता यांचे पत्नी सुरेश केशव तायशेटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगेश याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगेश हा कामानिमित्त पत्नी व मुलांसोबत फोंडाघाट येथे भाडयाने राहतो. मंगेश घर बांधण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून वडिलांकडे जमिनीची मागणी करीत आहे. ही जमीन देण्याबाबतच सुरेश हे पत्नी व मोठा मुलागा श्रेयस यांना घेऊन तहसील कार्यालयात आले. तेथे दाखल मंगेश याला जमिनी देण्याबाबतचा बॉंडपेपर वाचायला दिला व त्यात काही बदल करायचा असल्यास सांगायला सांगितले. मात्र, मंगेश याने आई संगीता, वडिल सुरेश, भाऊ श्रेयश यांना जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुकी केली. परिणामी सुरेश यांनी पोलीस ठाणे गाठून मंगेश याच्याविरोधात तक्रार दिली.
याच रागातून मंगेश याने पोलीस ठाणे गाठून भावाच्या गाडातील हवा काढली. त्यामुळे घाबरलेल्या सुरेश यांनी आपल्यासह पत्नी, मुलगा यांना घरी सोडण्याची पोलिसांना विनंती केली.त्यानुसार पोलीस तिघांना घरी सोडायला आले होते. मात्र, घरी असलेला मंगेश हा कोयता घेऊन आई, वडील, भावाच्या अंगावर धावला. पोलिसांनी त्याला रोखले खरे. मात्र, त्यानंतर मंगेश याने आई संगीता हिच्यावर डोक्यावर मधोमध मोठा दगड मारला. त्यात संगीता या गंभीर जखमी झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मंगेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुनील वेंगुर्लेकर करीत आहेत.