शेजारील महिलेचे मंगळसूत्र चोरले ; बँकेत गहाण ठेवले

पोलिसांनी २४ तासात ताब्यात घेतले
Edited by: दीपेश परब
Published on: August 14, 2025 18:39 PM
views 1351  views

वेंगुर्ले : शहरातील राजवाडा भागात आपल्या शेजारील महिलेचे २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून ते बँकेत गहाण ठेवल्याप्रकरणी राजवाडा येथीलच अनुपमा सुहास तांडेल (वय -५०) हिला वेंगुर्ला पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. 

   बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला राजवाडा येथील अंजली भिकाजी कुबल या महिलेने आपले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र २७ जुलै २०२५ ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चोरी झाल्याची तक्रार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीत तिने म्हटले होते की, अज्ञात व्यक्तीने घराचे दरवाजे उघडून बेडरूम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले मंगळसूत्र चोरून नेले आहे. 

   दरम्यान याबाबत आज १४ ऑगस्ट रोजी  या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दित शोध घेत असताना गोपनीय माहितीनुसार आरोपी अनुपमा सुहास तांडेल हिला राहत्या घराजवळून ताब्यात घेतले.

    याबाबत तिची अधिक चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा आपण केल्याची कबुली देऊन चोरी केलेले मंगळसूत्र एका बँकेत गहाण ठेवले असल्याचे सांगितले. याबाबत सदर बँकेत जाऊन चोरीस गेलेले मंगळसूत्र पाहून सदरचे मंगळसूत्र नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले असलेबाबत खात्री करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीचा गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत छडा लावण्यात आला आहे. 

       सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार डाँमनिक डिसोजा, जॅक्सन घोंनसालविस, अमर कांडर, वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड , महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपाली मटकर, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.