पावणेदोन लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

जंगलमय भागात सुरू होती दारू विक्री
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 30, 2025 14:15 PM
views 559  views

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरात मटका अड्डयावर टाकलेल्या धाडीनंतर जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस आता 'अलर्ट' झाले आहेत. मागील काही दिवस जिल्ह्यात अवैध मटका, दारू, गुटखा विक्रीवर पोलिसांकडून कारवाई सत्र सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी कासार्डे-आनंदनगर येथील जंगलमय भागात कणकवली पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ६४ हजार ४५० रुपयांची गोवा बनवटीची दारू जप्त केली. सायंकाळी ६.१० वा. सुमारास करण्यात आलेल्या कारवाईप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तेजस रवींद्र भांबुरे (३२, रा. तळेरे-बाजारपेठ), सागर डंबे (रा. तळेरे), गुरू पाटील (रा. सावंतवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कासार्डे दूर क्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे, हवालदार पांडुरंग पांढरे, कॉस्टेबल स्वप्नील जाधव यांनी केली. मागील काही दिवसांत कणकवली तालुक्यात अवैध दारू विक्रीवर झालेल्या कारवायांपैकी ही देखील एक मोठी कारवाई आहे. सहाजिकच अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


कासार्डे-आनंदनगर येथे जंगलमय भागात गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असल्याची टीप कासार्डे‌ दूरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे यांना मिळाली. त्यानुसार झोरे व स्वप्नील जाधव यांनी आनंदनगर येथील जंगलमय भाग गाठला. तेथे तेजस भांबुरे हा गोवा बनवाटीची दारू बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. वेगवेगळ्या मापांच्या, वेगवेळ्या कंपन्यांच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वृपाली बरंगे, पांडुरंग पांढरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.


दरम्यान, सदरची दारू सागर डंबे याच्या मालकीची असून ती गुरू पाटील याने आपल्यापर्यंत पोहोचवली असे संशयित तेजस भांबरे यांनी पोलीस चौकशीत सांगितले. चौकशीअंती स्वप्नील जाधव यांच्या फिर्यादीनुसार वरील तीन संशयितांविरोचा गुन्हा दाखल करण्यात आला.