गांजा विक्रीवर एलसीबी पोलिसांची धाड

भल्या पहाटे कारवाई ; युवक अटक
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 31, 2025 10:46 AM
views 1168  views

कणकवली :कणकवली शहरातील बांधकरवाडी येथे भाड्याच्या घरात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. रविवारी भल्या पहाटे ४ वा. सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी (२०, कणकवली - बांधकरवाडी) याला एलसीबीच्या पोलिसांनी अटक केली.  त्याच्याकडून तब्बल ३८० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 


शुभम याने विक्रीच्या उद्देशाने भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये गांजा ठेवला असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना प्राप्त झाली‌. त्यानुसार एलसीबीचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक आनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीची टीम बांधकरवाडी येथे पोहोचली. हाडळ यांनी सदर घराचा दरवाजा ठोठावून संशयित शुभम उर्फ कुंदन याला उठवले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता हॉलमधील एका बॅरेलमध्ये कपड्यांखाली लपवलेली गांजाची तब्बल ३० पाकिटे आढळून आली. 

कारवाईमध्ये पीएसआय अनिल हाडळ यांच्यासमवेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार घोन्साल्वीस, एम. पी. राणे, डी. एस. डिसोजा, पी. एस. कदम, बी. पी. डिसोजा, महिला हवालदार आर. आर. खानोलकर, कॉन्स्टेबल डी. जी. तवटे आदी सहभागी झाले होते.