कुडाळमधील बेल नदी पुलावर मोठे भगदाड

निकृष्ट कामामुळे दर्जावर प्रश्नचिन्ह
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 19, 2025 14:04 PM
views 222  views

कुडाळ : कुडाळ शहरातील बेल नदीवरील पुलावर मोठे भगदाड पडल्याने पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर ठेकेदाराकडून डागडुजीचे काम सुरू असले, तरी आज ही 'मलमपट्टी' उखडून पडल्याने कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे.

या पुलावर अनेक दिवसांपासून खड्डे पडत होते. ठेकेदार हे खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करत होते, पण आज ही मलमपट्टी निघून पुलाला पडलेले मोठे भगदाड स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे पुलाच्या कामासाठी वापरलेले साहित्य किती हलक्या दर्जाचे आहे हे सिद्ध होत आहे.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि निकृष्ट कामे या भगदाडामुळे पुन्हा एकदा समोर आली आहेत.

या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे, त्याच्याकडून पुलाचे काम योग्य पद्धतीने करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुलाच्या या अवस्थेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ठोस पाऊले उचलावी अशी मागणी जोर धरत आहे.