
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर कुडाळ राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून, विभागाने अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत तब्बल ५ लाख ६८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊन अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही पाच ते सहा महिने कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राणे, जगन्नाथ गावडे आणि इतर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन दारूच्या बाटल्यांचा हार त्यांच्या गळ्यात घालून अनोखे आंदोलन केले होते.
या आंदोलनानंतर कुडाळ उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आणि त्यांनी तत्काळ अवैध दारू माफियांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. विभागाने आतापर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून एक वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच, सात जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई आणखी वेगाने सुरू आहे. या धडक कारवाईमुळे कुडाळ तालुक्यातील अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. यापुढील काळातही ही कारवाई सुरूच राहील, असे संकेत मिळत आहेत.