कुडाळ पोलिसांची अवैध व्यवसायावर कारवाई

चार जणांवर गुन्हे दाखल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 22, 2025 20:32 PM
views 110  views

कुडाळ : कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका आणि जुगाराविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कुडाळ पोलिसांनीही अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तालुक्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मटका जुगार आणि अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण ९ हजार ९० रुपये रोख रक्कम आणि ४ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.

माणगावात मटका जुगारावर छापा 

पोलिसांनी गुरुवारी दुपारी १२:५५ वाजता माणगाव पेडणेकरवाडी तिठा येथे छापा टाकून ६८ वर्षीय अंतोन फ्रान्सिस रोड्रिक्स याला ताब्यात घेतले. हा आरोपी कल्याण नावाचा मटका जुगार चालवत होता आणि त्याच्याकडून ८२० रुपये रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आनंद अर्जुन पालन यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार श्री. भोई करत आहेत.

पिंगुळी येथे अवैध दारू व्यवसाय उघडकीस

रात्री ८:३० वाजता पोलिसांनी पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे अवि वडापाव सेंटरजवळ छापा टाकून उत्तम प्रकाश गावडे (वय ४०) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मेकडॉल व्हिस्की आणि बब्स लेमन व्होडका अशा एकूण ४ हजार ८०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. गोवा बनावटीचा प्रोव्ही माल गैरकायदेशीर बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गणेश चव्हाण यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे.

झाराप तिठा येथेही मटका जुगाराचा पर्दाफाश 

यानंतर, पोलिसांनी रात्री ८:४५ वाजता मुंबई-गोवा हायवे लगत असलेल्या झाराप रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पान टपरीवर छापा टाकला. येथे प्रवीण प्रभाकर घाडी (वय ४२) रा सळगाव, हा मुंबई मटका जुगार खेळवत असताना आढळला. त्याच्याकडून ४ हजार ५६० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सागर महादेव देवार्डेकर यांनी फिर्याद दिली आहे.

हॉटेल गुलमोहरजवळ मटका जुगारावर छापा

२२ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता पोलिसांनी हॉटेल गुलमोहरच्या समोर असलेल्या स्वामी समर्थ जनरल स्टोअरजवळ छापा टाकला. यात नरेश मोहन सरमळकर (वय ४२) रा सरंबळ, हा लक्ष्मण अनंत खोचरे (वय ४०) रा हळदीचे नेरूळ याच्या सांगण्यावरून मुंबई मटका जुगार खेळवताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ३ हजार ७१० रुपये रोख रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) आणि भारतीय न्याय संहिता कलम ४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल जगन्नाथ चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या सलग कारवाईमुळे तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कुडाळ पोलिसांनी ही माहिती दिली आहे