
कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथे शुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना बेदम मारहाण केली. त्यामधील एका युवकाच्या डोकीवर फावडे मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार नोंद करून घेण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुढीपूर येथील महामार्गनजीक सर्विस रस्त्यावर तीन परप्रांतीय युवक नाचत होते म्हणून स्थानिक युवकांनी त्यांना हे कृत्य इथे करू नका म्हणून सांगितले. याचा राग त्या परप्रांतीय युवकांना आला आणि त्या परप्रांतीय युवकांनी दोन स्थानिक युवकांना पकडून आपल्या खोलीमध्ये घेऊन जाऊन मारहाण केली आणि एका युवकाच्या डोक्यावर फावड्याने गंभीर जखम केली. या युवकाला जिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. ही घटना समजल्यावर पुन्हा पोलीस ठाणे येथे कुडाळ आणि पिंगुळी गुढीपूर येथील स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.