
कणकवली : कणकवली शहरातील तालुका स्कुल समोरील सना कॉम्प्लेक्स मधील मंगेश तळगावकर यांच्या मालकीच्या भालचंद्र ज्वेलर्सला चोरट्यानी लक्ष्य केले. हा दुकानफोडीचा प्रकार
बुधवार 16 जुलैला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली. सना कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे डॉ. केळकर यांना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भालचंद्र ज्वेलर्सचे शटर खोलल्याचा आवाज आला. डॉ केळकर यांनी तातडीने तळगावकर यांना माहिती दिली. तळगावकर काही वेळातच दुकानजवळ पोचले. मात्र तत्पूर्वीच चोरांनी दुकानात सना कॉम्प्लेक्स सोसायटीची ठेवलेली लाखोंची रोकड, सोन्या चांदीचे दागिने लंपास करून पसार झाले होते.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरी होत असताना रेकॉर्ड झाले असून एकूण चार संशयित चोर असल्याचे दिसून येत आहे. तिघे चोर दुकानात होते तर एक दुकानाबाहेर थांबून असल्याचे दिसून येत आहे. चोरी करून चोरटे सना कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूने, सोनगेवाडी रस्त्याच्या दिशेने पळून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. चोरी करून जाताना सना कॉम्प्लेक्स च्या मागील बाजूस चांदीच्या दागिन्यांचा बॉक्स टाकलेला सापडून आल्याची माहिती मिळत आहे.
कणकवली शहरात वर्षभरापूर्वी अनेक घरफोड्या घडल्या होत्या. त्यातील एका चोरट्यास अटक झाल्यानंतर घरफोडीचे सत्र थांबले होते. मात्र चोरट्यांनी आता ज्वेलर्स दुकानाला लक्ष्य केल्याने नागरिक, व्यापारी, दुकानदारांमध्ये घबराहट पसरली आहे.