डॉक्टरला ७ लाखांचा गंडा..!

Edited by:
Published on: September 22, 2025 13:00 PM
views 554  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील एका डॉक्टरची आॅनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टराने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

त्या डॉक्टराने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ४ जुलै रोजी त्यांना  एका मोबाईल नंबरवरून 'प्रिया देसाई' नावाच्या महिलेचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. तिने स्वत:ला आयआयएफएल कॅपिटल या कंपनीतील सहाय्यक असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये प्रीमियम स्टॉक खरेदीबाबत चौकशी करण्यास सांगितले. प्रिया देसाई नामक व्यक्तीने डॉक्टर यांना १२३९ १व्ही १ प्रीमियम व्हीआयपी सर्व्हिस ग्रुप या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले आणि विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यास सुचवले. सुरुवातीला नफा झाल्याने डॉक्टरचा तिच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर तिने आयआयएचएनडब्ल्यूएफएल  नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून ‘इन्स्टिट्यूशनल स्टॉक’ मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. डॉक्टरनी फेडरल बँक आणि स्टेट बँक आॅफ इंडिया या खात्यांतून मिळून ७,०३,००० रुपये विविध खात्यांवर आॅनलाइन ट्रान्सफर केले. त्या अ‍ॅपमध्ये त्यांना १२,३१,७७६ रुपये नफा दाखवला गेला; मात्र रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती विथड्रॉल न होता प्रिया देसाईने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर संपर्क तोडला. आपली  फसवणूक लक्षात आल्यानंतर डॉक्टरनी १६ आॅगस्ट रोजी आॅनलाइन तक्रार नोंदवली. शनिवार १९ सप्टेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.