पोलीस असल्याचं सांगून लुट ; इराणी टोळीतील आरोपीला ठोकल्या बेड्या

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 14, 2025 13:53 PM
views 300  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) सांगलीतून अटक केली आहे. या आरोपीचे नाव अबूतालीब मुसा इराणी (वय ३१, रा. इराणी वस्ती, सांगली) असे आहे.

४ ऑगस्ट २०२५ रोजी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता (गुन्हा रजि. नं. ७१/२०२५). त्याच दिवशी सावंतवाडी पोलीस ठाण्यातही असाच एक गुन्हा नोंदवण्यात आला होता (गुन्हा रजि. नं. १४६/२०२५). दोन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून वृद्ध व्यक्तींना लुटले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सांगली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी चार दिवस सांगलीत कसून शोध घेतला आणि विश्रामबाग परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ फिरत असताना संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अटक करण्यात आले. न्यायालयाने त्याला १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. यात उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा सहभाग होता. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इराणी टोळीच्या गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.