
सावंतवाडी : बांदा येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 13 लाख 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यात 5 लाख 81 हजार 600 रुपयांची दारू आणि 8 लाख रुपयांची एर्टिगा कार (क्रमांक TG-16-A-4241) समाविष्ट आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बुधवार, 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास, बांदा येथील कट्टा कॉर्नर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कारमधून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून ही गाडी थांबवली. तपासणी केली असता, गाडीमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. यावेळी,
पोलिसांनी गाडीतील दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे भुमेश नरसिंह इस्पी (वय 39) आणि अजय कुमार अंजय्या गोपू (वय 28) अशी आहेत. दोघेही तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या दारूची एकूण किंमत 5 लाख 81 हजार 600 रुपये आहे. याशिवाय, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 8 लाख रुपये किमतीची एर्टिगा कारही जप्त करण्यात आली आहे.
बांदा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा (गु.र.नं. 142/2025) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे करत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, हवालदार शेखर मुणगेकर, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सावंत आणि महिला हवालदार आदिती प्रसादी यांचा समावेश होता.