1 कोटी 8 लाख रुपयांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त !

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 16:01 PM
views 340  views

सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर मोठी कारवाई केली. अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरसह सुमारे १ कोटी ८ लाख ८० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उत्पादन शुल्क पथकाने मध्यरात्री १.०० वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. गोवा बनावटीची रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ७२ हजार बाटल्या असलेले एकूण १५०० कागदी खोके असे अंदाजे ९३ लाख ६० हजार तर टाटा मोटर्स कंपनीचे तपकिरी रंगाचे केबीन असणारे बाराचाकी कंटेनर (क्र. GJ-10-Z-9984), किंमत अंदाजे १५ लाख व दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

रामनिवास (वय २५, रा. माणकी, बाडमेर, राजस्थान) व नूर आलम (वय २६, रा. पितईपूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून  आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई), पी. पी. सुर्वे (सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता), विजय चिंचाळकर (विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर), वश्रीमती किर्ती शेडगे (अधीक्षक, सिंधुदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक यांच्या पथकातील धंनजय साळुंखे (दुय्यम निरीक्षक), विवेक कदम (दुय्यम निरीक्षक) आणि जवान  रणजीत शिंदे, दिपक वायदंडे, सतिश चौगुले, अभिषेक खत्री, सागर सुर्यवंशी यांनी ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास धंनजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.