नाथ पै नगर येथे गोवा बनावटीची दारू जप्त; एलसीबीची कारवाई

अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 18, 2025 21:58 PM
views 280  views

कणकवली : स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी ३ लाख ५४ हजार ४०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू शहरातील नाथ पै नगर येथे जप्त केली. कारमधून या दारूची वाहतूक केली जात होती. ही कारवाई शनिवार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश सुरेश सावंत (३५, रा.वरवडे) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करत असताना नरडवे रोडवरून नाथ पै नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कोकण रेल्‍वेच्या वीज सबस्टेशननजीक एक पांढऱ्या रंगाची कार उभी असलेली दिसली. या कारचा वावर संशयास्पद असल्‍याने पोलिसांनी तपासणी केली. त्‍यावेळी कारमध्ये पुठ्ठ्याचे तब्‍बल ४३ बॉक्स आढळून आले. हे बॉक्‍स उघडले असता गोवा बनावटीची दारू आढळून आली.  या सर्व बॉक्‍समध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांची दारूच्या बाटल्‍या भरलेल्या होत्या. या सर्वांची किंमत ३ लाख ५४ हजार ४०० रुपये आहे. 

पोलिसांनी कारसह सर्व अवैध गोवा बनावटीची दारू जप्त केली. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार राजेंद्र गोसावी यांनी ही कारवाई केली. अवैध दारू वाहतूकप्रकरणी प्रकाश सावंत याच्यावर महाराष्‍ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतूक करणारी कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर सावंत करीत आहेत.