
कणकवली : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेसमधून २१ हजार रुपयांची गोवा बनावटीसी दारू रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) जप्त केली. ही कारवाई कणकवली रेल्वेस्थानक येथे गुरुवारी दुपारी २ वा. सुमारास करण्यात आली. मात्र, ही चोरटी दारू शवाहतूक करणारा संशयित सापडू शकलेला नाही.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधून (१६३३६) दारूवाहतूक सुरु असल्याची माहिती आरपीएफला प्राप्त झाली. त्यानुसार आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज पाटील, अनंत मेलशिंगरे, कॉन्स्टेबल एच. पी. शिंदे यांनी प्लॅटफॉर्म गाठला. स्थानकावर दाखल झालेल्या, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम - ओखा एक्सप्रेसची तपासणी केली असता 'एस - ५' या बोगीमध्ये दोन गोणी आढळून आल्या. आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी गोणी उघडून पाहील्या असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. कर्मचाऱ्यांनी बोगीमधील प्रवाशांचीही चौकशी केली. मात्र, संशयित सापडू शकला नाही. जप्त मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जमा करण्यात येणार असल्याची माहिती आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांनी दिली.
दरम्यान आरपीएफतर्फे कोकण रेल्वे मार्गावरून जात असलेल्या सर्व रेल्वेगाड्यांची तपासणी होत असते. त्यामुळे चोरटी दारू वाहतूक करण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असा इशाराही आरपीएफतर्फे देण्यात आला आहे.