
वेंगुर्ले : वेंगुर्ला पवार हाऊस तिठा येथे गांजा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी कारवाई केली आहे. यात २६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून मूळ बेळगाव व सध्या राहणार हरमल गोवा येथील सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय-२१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई ११ ऑगस्ट रोजी रात्री वेंगुर्ला पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान वेंगुर्ले पॉवर हाऊस तिठा येथे केली. पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक गवारी, पोलिस हवालदार योगेश राऊळ, जोशेफ डिसोझा, अमोल धुरी, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, मनोज परुळकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करत आहेत.