
कणकवली : तालुक्यातील वारगाव-रोडेवाडीतील घराच्या देवघरात लवपून ठेवलेला गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने जप्त केला. ११२ ग्रॅमचा ३ हजार किमतीचा गांजा आहे. ही कारवाई एलसीबाच्या पथकाने मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास केली. गांजा बाळगल्याप्रकरणी प्रवीण उर्फ बबन आत्माराम गुरव (५५, रा. वारगाव-रोडेवाडी) याला एससीबीच्या पथकाने अटक केले. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पीएसआय अनिल हाडळ, रामचंद्र शेळके, हवालदार सदानंद राणे, डॉनिक डिसोझा, हवालदार किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, जॅक्सन घोसालविस, आशीष जमादार महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी केली. संशयित आरोपी प्रवीण गुरव याने अंमलीपदार्थ गांजा साठा ठेवल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला. पथकातील पोलिसांनी गुरव याच्या घराची तपासणी केली असता घरातील देवघरात गांजा आढळून आला. सदर गांजा पोलिसांनी जप्त केला. ३००० रुपये किंमतीचा ११२ ग्रॅम गांजा आहे. गांजा बाळल्याप्रकरणी प्रवीण गुरव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.