बिबट्याची नखे व सुळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 30, 2025 21:17 PM
views 523  views

कणकवली : बिबट्याची नखे व सुळ्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या टोळक्याला वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. कणकवली - फोंडा रस्त्यावरील डामरे येथील स्वामी समर्थ मठानजीक मंगळवारी सायंकाळी ४ वा. सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत वन विभागाच्या पथकाने १२ वाघनखे व ४ दात जप्त केले. 

याप्रकरणी विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव), परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहळ,  ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशा चार जणांना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बिबट्याच्या नखे व सुळ्यांची तस्करी होत असून सदर संशयित गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला गुप्त माहिती घराकडून मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने कणकवली - फोंडा रस्त्यावरील डामरे येथील स्वामी समर्थ मठ येथे धाव घेऊन सापळा रचला. विशेष म्हणजे वन विभागाच्या पथकाने एक तोतया गिऱ्हाईकही तयार केले व सदर गिऱ्हाईकास संशयितांशी संपर्क साधायला लावला. त्यानुसार घटनास्थळी तीन दुचाकी आल्या. दुचाकींवर एकूण चार संशयित होते. वन विभागाने तयार केलेल्या तोतया गिर्‍हाईकाने संशयीतांशी संवाद‌ सुरू केला. संशयतांनी आपल्याकडील बिबट्याची वाघनखे व सुळे दाखवतानाच पैशाची मागणी केली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वनविभागाच्या पथकाने चारही संशयतांना अटक केली.

सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक जी गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक तथा (खाकुता व वन्यजीव) सावंतवाडी एस्. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली एस. एस. पाटील, वनपाल फोंडा धुळू कोळेकर, वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील, वनरक्षक सुखदेव गळवे,  प्रतिराज शिंदे, सिध्दार्थ शिंदे, रामदास घुगे, नितेंद्र पोर्लेकर, रोहित सोनगेकर, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, रिध्देश तेली, सागर ठाकूर यांच्या पथकाने केली. कारवाईमध्ये रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

चारही संशयिना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी सदर बिबट्याची कुठे शिकार झाली आहे, गुन्ह्यामध्ये आणखी संशयितांचा सहभाग आहे का,‌ याबाबतच्या तपासासाठी संशयितांना वनकोठडी देण्यात यावी, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील यांनी दिली.