चिपळुणातील तीन सोसायट्यांतील लाखो रुपयांचा अपहार

सचिवाला पोलिस कोठडी
Edited by: मनोज पवार
Published on: August 26, 2025 23:03 PM
views 178  views

चिपळूण : तालुक्यातील चार सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव योगेश प्रमोद भोबेकर याला चिपळूण पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भोबेकर हे , भोम, कालुस्ते, मालदोली आणि भिले या तीन सोसायट्यांमध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. लेखापरिक्षक तसेच सहायक निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तिन्ही सोसायट्यांची तपासणी केली असता, दप्तर उपलब्ध नसल्याचे आढळले. यामुळे सहकार विभागाने तिन्ही सोसायट्यांचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे.

गतवर्षी उघडकीस आलेल्या तपासणीत मालदोली, भोम, भिले आणि कालुस्ते या चार सोसायट्यांमध्ये सचिवाने सुमारे ५५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे आढळले. भोम सोसायटीच्या लेखापरिक्षणात सचिवाने सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याची माहिती समोर आली. उर्वरित तीन सोसायट्यांमध्येही सचिवाने अपहार केला असल्याचे सहायक निबंधक अधिकाऱ्यांनी नोंदवले.

मालदोली येथील सचिव भोबेकर यांना सोसायटींनी नियुक्त केले होते. अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या भोबेकर यांनी २०२३-२४ आर्थिक वर्षातील कर्जदारांकडील थकित रक्कम भरणा न केल्याचे एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेच्या तपासणीत समोर आले. भोबेकर यांनी ५५ लाखांची वसुली वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचे लेखी कबूल केले.

सहायक निबंधक कार्यालयाच्या सूचनेनुसार, संबंधित सोसायट्यांचे दप्तर उपलब्ध झाल्यानंतर लेखा परिक्षण पुन्हा सुरू होणार आहे. यावेळी भिले, मालदोली आणि कालुस्ते येथील संचालक अपात्र ठरवून बरखास्त करण्यात आले आहेत.