
कणकवली : साळीस्ते येथे आढळलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर) यांच्या खूनप्रकरणी मागील १० ते १२ दिवसांपासून बेंगलोर येथे ठाण मांडून असलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण शोधमोहीम राबवत अखेर या खून प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली. वर्धन के. एन. (वय २०, रा. बेंगलोर) असे या आरोपीचे नाव आहे. वर्धन याला बुधवारी सायंकाळच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला घेऊन एलसीबीचे पथक गुरुवारी सकाळी ८ वा. सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. विशेष म्हणजे श्रीनिवास यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करण्यामध्ये वर्धन याचा समावेश आहे. त्याला आज गुरुवारीच दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाऊ शकते. दरम्यान या खूनप्रकरणी यापूर्वीच अटक असलेल्या चारही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आजच संपली असून त्यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.














