गोवा बनावटीच्या दारूवाहतूकीवर एक्साईजची कारवाई

अडिच लाखांची दारू जप्त | ट्रकचालकावर गुन्हा दाखल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 18, 2025 21:31 PM
views 64  views

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या, गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असलेल्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने कारवाई केली. गुरुवारी सकाळी १०.३० वा. सुमारास ओसरगांव येथील टोलनाक्यानजीक करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख ४० हजाराची दारू, ७ लाखांचा ट्रक मिळून ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालक राजबीरसिंह छेदीलालसिंह (४१, मूळ इन्सुली, ता. सावंतवाडी व सध्या रा. ओसरगांव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजबीरसिंह हा मुळचा पंजाबी असल्याची माहिती एक्साईजच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

महामार्गावरून एका ट्रक‌द्वारे चोटी दारूवाहतूक सुरु असल्याची माहिती एक्साईजच्या कणकवलीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने ओसरागांव टोलनाका गाठला. सकाळी १०.३० वा. सुमारास मुंबईच्या दिशेने जात असलेला एमएच ०७ एजे२३२५ हा ट्रक पथकाने थांबविला. ट्रकचालक राजबीरसिंह विसंगत उत्तरे देत असल्याने एक्साईजच्या पथकाला संशय आला. पथकाने ट्रकचा हौदा उघडला असता आतमध्ये एमआयडीसीमध्ये वापरले जाणारे प्लास्टीक आढळून आले. मात्र, पुढील पाहणीत सदर प्लास्टीकच्या खाली दारूने भरलेले बॉक्स आढळून आले.

तब्बल २० बॉक्स पथकाने जप्त केले. संशयित राजबिरसिंह हा ओसरगांव परिसरात यापूर्वी ढाबा चालवायचा, अशी माहितीही एक्साईजच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. कारवाईमध्ये एक्साईजच्या सिंधुदुर्ग अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कणकवलीचे निरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील, जवान रवी जानकर, अजित गावडे आदी सहभागी झाले होते.

एक्साईजचा इशारा - गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर एक्साईजचे पथक नेहमीच लक्ष ठेवून आहे. पथकाद्वारे महामार्गावर ठिकठिकाणी सातत्याने तपासणी केली जाते. हीच तपासणी यापुढे आणखीन वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असा इशारा एक्ससाइजच्या कणकवली कार्यालयातर्फे देण्यात आला आहे