
सावंतवाडी : मळेवाड, भटवाडी येथे दिनांक १९ जुलै २०२२ रोजी एस.टी. बसला धडक दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात, संशयित डंपर चालक भरत सुरेश कुबल यांची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै २०२२ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता गावमौजे मळेवाड भटवाडी येथे मळेवाडकडून येणाऱ्या एका डंपर चालकाने एस.टी. महामंडळाच्या बसला धडक दिली होती. या अपघातासंदर्भात दत्ताराम मधुकर सावळ यांच्या फिर्यादीनुसार संशयित डंपर चालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३७ (दुखापत करणे) आणि मोटारवाहन अधिनियम १९८८ कलम १८४ (धोकादायक ड्रायव्हिंग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या सुनावणी दरम्यान, आरोपीतर्फे ॲड. सिध्दार्थ भांबुरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. ॲड. भांबुरे यांनी साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती न्यायालयासमोर आणून भरत सुरेश कुबल यांचा या गुन्ह्याशी काहीही चूक किंवा संबंध नसल्याचा प्रभावी बचाव केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन, न्यायालयाने नमूद केले की, संशयित भरत सुरेश कुबल यांच्या विरोधात सबळ पुरावा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे, न्यायालयाने त्यांची सदर प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.